सौदी अरेबिया देशात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सौदी अरेबिया येथे पवित्र हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना उष्माघातामुळे प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत जळगाव शहरातील दोन भाविकांचा समावेश आहे. भाविकांच्या मृत्यूमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी नगर परिसरात उस्मानिया पार्क भागामध्ये अली मिया नगर येथे डॉ. उमर देशमुख हे वास्तव्याला आहे. त्यांचे वडील अब्दुल रफिक देशमुख (वय ६५) आणि आई शाहीन बेगम अब्दुल रफिक देशमुख (वय ६१) हे नुकतेच सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले आहेत. त्या ठिकाणी मीना परिसरात उष्माघातामुळे १ हजार भाविकांचा मृत्यू झाला. यात शाहीन बेगम यांची प्रकृती खराब झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.(केएसएन) दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळे देशमुख परिवारावर शोककळा पसरली आहे. शाहीन बेगम यांच्या पश्चात पती, ३ भाऊ असा परिवार आहे.
पिंप्राळा हुडको भागात गुलशन रजा कॉलनी येथे राहणारे अकमल खान अफजल खान (वय ५४) हे पत्नी शबानाबी खान यांच्यासह हज यात्रेला सौदी अरेबिया येथे गेलेले होते. अकमल खान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील नॅशनल उर्दू हायस्कुल येथे शिक्षक आहेत. सौदी अरेबिया येथे मीना परिसरात त्यांना चक्कर आली. त्याठिकाणी काही वेळ पत्नी शबानाबी यांच्यापासून त्यांची ताटातुट झाली. मात्र थोड्यावेळाने शबानाबी यांनी पाहिले तर अकमल खान यांना चक्कर आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत होती.(केएसएन) दरम्यान,अकमल खान यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना लगेच त्या ठिकाणी मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे नातेवाईकांनी “केसरीराज”शी बोलताना सांगितले.
जळगाव जिल्हा प्रशासनाकडे अद्याप याबाबत कुठलीच अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचे दिसून आले आहे.