नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणातील घटना
नंदुरबार (प्रतिनिधी) : धरणातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा दगडावरून पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणात बुधवारी दि. २२ मे रोजी सकाळी घडली. यामध्ये बेडकी येथील दोन युवतींचा समावेश आहे.
नवापूर तालुक्यातील बेडकी येथील उज्वला जयंत्या गावित (वय १६) आणि मिखा सानु गावित (वय १६) दोन्ही मैत्रिणी बेडकी गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी आंघोळीला गेल्या होत्या. धरणाच्या काठावरील दगडावर बसुन त्या आंघोळ करत असताना उज्वला गावित आणि मिखा गावित यांचा पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही.
घटना घडली यावेळी परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू न शकल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आले. दरम्यान विसरवाडी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सदर घटनेत दोन्ही जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.