जेवण बनवून न दिल्याच्या रागातून हल्ला केल्याचा आरोप; येवती गावात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) :- जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय अंदाजे ६३) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जेवणावरून वाद झाल्याचा आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. गणेश याच्या दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहितीही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील फिर्यादी आकाश रविंद्र महाजन (वय २४) हे मृत अलकाबाई यांचे नातू आहेत. ते जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे आपल्या मेव्हण्याकडे राहून मजुरीचे काम करतात. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.०५ वाजता त्यांचा भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आकाश महाजन हे मेव्हणे धर्मराज शशिकांत पाटील यांच्यासोबत तातडीने येवती येथे पोहोचले.
घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळली वृद्ध महिला
पहाटे सुमारे ५.३० वाजता ते अलकाबाई यांच्या घरी पोहोचले असता, घरासमोर नागरिकांची गर्दी जमली होती. घरात जाऊन पाहिले असता अलकाबाई या रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती. जवळच गणेश वाघ हातात खुरपे घेऊन बसलेला दिसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली फुटलेली लोणच्याची बरणी आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे लोखंडी अवजार पडलेले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
लोणच्याची बरणी आणि खुरप्याने हल्ला केल्याचा आरोप
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आकाश महाजन यांनी गणेश वाघ याला घटनेबाबत विचारणा केली. त्यावेळी जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारली आणि त्यानंतर खुरप्याने वार केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या माहितीनंतर आकाश महाजन यांनी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बोदवड पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने येवती गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी, आरोपीची भूमिका आणि इतर बाबींचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.








