धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन नेण्यास विरोध; पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या नियोजित मार्गावरून वाद निर्माण झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन नेण्यास एका गटाने विरोध दर्शविल्यानंतर महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर परिस्थिती अधिक चिघळल्याने परिसरात तुरळक दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे समजते. या घटनेमुळे किनगाव परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन काढण्याची तयारी सुरू होती. मात्र, पथसंचलनाच्या नियोजित मार्गावर असलेल्या एका धार्मिक स्थळासमोरून रॅली नेण्यास एका गटाने आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर काही महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. या घडामोडींमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, वाद वाढत असताना तुरळक दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि जमावाला पांगवता यावे, यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच यावल, रावेर आणि भुसावळ येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किनगाव येथे तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
पथसंचलनाच्या मार्गावरून सुरू झालेला वाद नेमका कोणत्या कारणामुळे चिघळला, दगडफेक कशी सुरू झाली आणि या प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका होती, याबाबत पोलीस माहिती घेत आहे. व त्यामुळे घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या अधिकृत निवेदनाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, परिसरातील शांतता आहे. आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.








