जळगाव (प्रतिनिधी) – मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी जात असताना ४०७ मालवाहू वाहनाचा मागील चाकाचा एक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला. जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

एक्सल तुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दोन वेळा पलटी झाले. या अपघातात लहान मुलांसह १९ जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास सुरू केला होता. हे वाहन ममुराबाद रोडमार्गे चोपडा आणि तेथून मध्य प्रदेशाच्या दिशेने जात होते. दरम्यान, कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराच्या पुढे जात असताना अचानक वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन दोन वेळा पलटी झाले. या घटनेमुळे वाहनातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. वाहनात सुमारे २० ते २५ जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती असून, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकांसह खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
या अपघातात कमल बारेला (वय २५), सुरेश देवसिंग बारेला (४०), रवींद्र सिताराम मोरे (१२), प्रवीण सिताराम मोरे (११), सईती मगन मोरे (७), नवलसिंग सिताराम मोरे (२५), रूपाली सावरिया बारेला (१८), रमेश धनसिंग बारेला (२८), राजाराम बारेला (४०), रितेश खुलसिंग बारेला (२३), पवन धासीलाल बारेला (८), विजय रेमला बारेला (२२), अर्जुन राजाराम बारेला (१८), सावरिया हिम्मत बारेला (३८), गांजीलाल बारेला (३०), सचिन बन्सीलाल बारेला (१५), बन्सीलाल चिनूसिंग बारेला (५५), सुनील दरबार बारेला (१५) आणि अजय गुडिया बारेला (१५) हे १९ जण जखमी झाले आहेत.
सत्संग कार्यक्रमासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रवासादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघाताचे नेमके कारण आणि अन्य तपशील संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. या घटनेबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.









