ठाण्यातील भिवंडी येथील घटना
ठाणे (प्रतिनिधी)- भाजपाची कार्यशाळा भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडली. कार्यशाळेला भाजपचे सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. महाविकास आघाडीवर जोरदार टिका करण्यात आली. पण या कार्यक्रमाआधी कार्यशाळेला आलेले ३ आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. पण अखेर त्यांची सुटका करण्यात आली. संकट मोचक अशी उपमा असलेले गिरीश महाजन यांनी लिफ्टचा पत्रा वाकून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
भिवंडीतील एका रिसॉर्टमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जात असताना लिफ्टमध्ये आमदार प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे आणि श्वेता महाले हे लिफ्टमध्ये अडकले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी या तीन आमदारांची लिफ्टमधून सुटका केली. आमदार मंदा म्हात्रे यांना लिफ्टमध्ये बराच वेळ अडकल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी प्रविण दरेकर यांनी त्यांना आधार दिला.
मंत्री गिरीश महाजन यांनी लिफ्टचा दरवाजा वाकवत दरेकर, म्हात्रे आणि महाले यांना बाहेर काढले. त्यामुळे या तीनही आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संकटमोचक् अशी ओळख असलेले महाजन पुन्हा एकदा भाजपाच्या आमदारांसाठी धावल्याचे दिसले. भाजपने महाराष्ट्रात २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांचा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लिफ्ट मध्ये अडकल्यानंतर त्यांना गिरीश महाजन यांनी बाहेर काढल्याची दिवसभर कार्यशाळेत चर्चा होती.