चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी): स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हातचालाखी करून कार्ड बदलून ४० हजार रुपये लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चाळीसगाव शहर पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरातून शिताफीने अटक केली आहे. सोनुकुमार पंचानंद सनगही (वय ३२, रा. भमरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विकास भावलाल राठोड (रा. चैतन्य तांडा, करगाव) हे भडगाव रोडवरील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी इसमाने मदतीचा बहाणा करून हातचालाखीने राठोड यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले आणि त्यांना दुसरे बनावट कार्ड दिले. त्यानंतर काही वेळातच राठोड यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राठोड यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ किशोर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता. घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर गुन्हा बिहारमधील आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, हा आरोपी सध्या कोपरगाव तालुक्यातील पडेगाव (जि. अहिल्यानगर) परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनेळ यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर, किशोर पाटील आणि नंदकिशोर महाजन यांचे विशेष पथक कोपरगावला रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पडेगाव शिवारात सापळा रचून सोनुकुमार सनगही याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याला चाळीसगाव येथे आणून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या आरोपीकडून अशा प्रकारचे इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, पोलीस हेकाँ किशोर पाटील पुढील तपास करत आहेत.









