मानवाधिकार परिषदेचे सूरज नारखेडे यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कर्मचारी भूषण तायडे याने अनधिकृतपणे गैरकारभार केलेला आहे. याबाबत वेळोवेळी माहिती देऊन देखील त्याच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामागे कार्यकारी अभियंताच त्याला अभय देत असावेत किंवा पाठराखण करीत असावेत असा आरोप मानवाधिकार परिषद युवा विभाग अध्यक्ष सूरज नारखेडे यांनी पत्रपरिषदेत केला आहे. तसेच, सीईओ श्री अंकित यांनी भूषण तायडे याच्याकडील विविध प्रभारी असलेले चार्ज काढून घेत त्याच्यावर चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. चौकशी समितीला २० दिवस दिले असून चौकशी झाल्यावर सीईओ कठोर कारवाई करतात काय याकडे आता लक्ष लागून आहे.
याबाबत मानवाधिकार समितीचे युवा विभागाचे अध्यक्ष सूरज नारखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. चौकशी समितीत अध्यक्ष म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, सदस्य म्हणून चाळीसगावचे उपअभियंता किरण बरे, शाखा अभियंता रमाकांत पाटील, अमरसिंग राजपूत यांचा समावेश आहे. भूषण तायडे हे अनधिकृत ठेकेदारी करतात व पत्नीच्या नावावर असलेले कामे स्वतः विद्युत शाखा अभियंता सहाय्यक म्हणून मोजमाप करून पुस्तिकेत अनधिकृतपणे नोंदवितात. यामुळे त्याने शासकीय पदाचा गैरवापर केला आहे. स्वतःच्या पत्नीच्या नावावर अमर्यादित रकमेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र करून त्यावरच जिल्हा परिषदेच्या विभागांचे करोडो रुपयांचे ठेके घेण्याचा धक्कादायक प्रकार भूषण तायडे या कर्मचाऱ्याने केला आहे. हा प्रकार शासन नियमबाह्य आहे.
भूषण तायडे हे कर्मचाऱ्यांमध्ये दबावतंत्र वापरून स्वतः विभाग चालवितात. कामवाटप करून ते कमिशन घेतात. याबाबत जिल्ह्यातील आमदारांनी कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठांना अवगत केले नाही. त्यामुळे कार्यकारी अभियंताही दोषी असल्याची माहिती सूरज नारखेडे यांनी दिली आहे. भूषण तायडे यांचेकडे स्टोअर किपरचा चार्ज असल्याने काही नवीन संगणकांची मागणी विभागातील अभियंत्यांनी केली होती. मात्र त्यांना संगणक उपलब्ध भूषण तायडे करून देत नाही. त्याबाबत भेदभाव करतात, असा आरोप नारखेडेंनी केला आहे. तसेच, भूषण तायडे हा मोठा आर्थिक गुन्हेगार आहे. त्यांच्यापासून आमच्या नारखेडे परिवाराला धोका आहे. त्यांचे प्रकरण हे कायद्याला धरून नाही, असे नारखेडे म्हणाले.
भूषण तायडेची २०१७ ला नोटा बदलीप्रकरणी झाली होती चौकशी
संशयित भूषण तायडे याची २०१७ साली जिल्हा बँकेतील नोटा बदलीप्रकरणी सुनील सूर्यवंशी, नंदकुमार पवार यांच्यासह भूषण तायडे याचीही सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने घराची झाडाझडती घेऊन काही कागदपत्रेही जमा केले होते. तेव्हापासून भूषण तायडेचे कारनामे बाहेर येत होते.