डीबी पथकाची कारवाई; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने गावठी पिस्टलसह ताब्यात घेतले. या कारवाईत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी डीबी पथकाला संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, घोडेपिर बाबा दर्गा परिसरात एक युवक गावठी पिस्टल व जिवंत काडतूस घेऊन येणार आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी अरसद अली शेख खालीद अली (वय २०, रा. आझाद नगर, बुरहानपूर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
चौकशीत हे शस्त्र मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याने ठेवण्यासाठी दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३६/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जीवन कापडे, चंद्रकांत रायपुरकर व अक्षय कोतकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे करीत आहेत.









