बंधाऱ्यात पोहोचले हतनुर धरणाचे पाणी
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीच्या बंधार्यात हतनूर धरणाचे पाणी पोहोचल्याने शहरवासीयांची महिनाभराची पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. शहरात खंडित वीजपुरवठ्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून ११ दिवसाआड होणार्या पाणीपुरवठ्याने नागरिक आधीच संतप्त झाले आहेत. त्यातच बंधार्यात पाणी नसल्याने त्याचा फटका नागरिकांना सोसावा लागत होता. शहरवासीयांना दिलासा मिळण्यासाठी पालिकेने प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केल्यानंतर नुकतेच एक हजार डे क्यूसेस प्रमाणे आवर्तन सोडण्यात आले असून हे पाणी शुक्रवारी सकाळी तापीच्या बंधार्यात पोहोचले आहे.
यापूर्वी बंधार्यात पाणी नसल्याने जॅकवेलमधून पाणी उचल करताना टप्पे घ्यावे लागत होते. टप्या-टप्याने पाणी उचल केली जात असल्याने त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला होता तर दहा दिवसांचा पाणीपुरवठा ११ दिवसांवर गेला होता. बंधार्यात पाण्याचे आवर्तन आल्यावर सुध्दा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे तर शहराला आता नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकीकडे साठवण बंधार्यात पाण्याची अडचण तर दुसरीकडे खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बंधार्यातील पाणी उचलण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी शहराचे पाणीपुरवठ्याचे रोटेशन पुढे ढकलले जात आहे. पाणीटंचाईत खंडित वीजपुरवठा डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. पालिकेतर्फे पाणी सोडले तरी वीजपुरवठा खंडित असल्याने नळधारकांच्या टाकीत पंपाअभावी पाणी पडत नाही. त्यामुळे त्या भागात पुन्हा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. यामुळे पाणी टंचाईत अजूनच भर पडत आहे.
या भागात टँकरने पाणीपुरवठा
शहरातील मुस्लीम कॉलनी, मोहित नगर, जळगाव रोड, नारायण नगर, साकरी फाटा, छायादेवी नगर, आरएमएस कॉलनी, जामनेर रोड आदी भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. खंडित वीजपुरवठयामुळे सुध्दा काही वेळेस टँकर भरले जात नाही त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होते. लाईट आल्यावर पालिकेच्या विहिरीवरून टँकरा भरून ते पाणी येत नसलेल्या भागात नागरिकांना वितरीत केले जाते.
नऊ दिवसाआड होणार पाणीपुरवठा
तापीच्या बंधार्यात हतनूर धरणाचे आवर्तन शुक्रवारी सकाळी पोहोचल्याने किमान महिनाभर पाण्याची चिंता आता मिटली आहे. शहराला नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे यापुढे नियोजन असेल, पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख म्हणाले.