भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; भुसावळ तालुका आणि बोदवड पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस
भुसावळ:


सराफा दुकानातून हातचलाखीने सोने चोरी करून फरार झालेल्या मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोल्यातून अटक केली आहे. आरोपीकडून भुसावळ तालुका आणि बोदवड पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांतील एकूण ४७.४८ ग्रॅम सोने आणि सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२९/२०२६ आणि बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अकोला येथून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून ३२.४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (अंदाजे किंमत ३ लाख २० हजार रुपये) आणि त्याच्या पत्नीकडून १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये) जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि एलसीबी प्रमुख राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विकास यशवंत बाविस्कर करत आहेत.








