जळगावात विविध घोषणा देत नाटिकाद्वारे केले प्रबोधन
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण व संचालनालयातर्फे अवयवदान जनजागृती अभियान राज्यभरात घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी विविध महाविद्यालयाच्या सहकार्याने जनजागृती रॅली घेण्यात आली. या रॅलीत प्रबोधनासाठी स्वातंत्र्यवीर चौकात लघुनाटिका सादर करण्यात आली.
सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या वेळेला वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शर्मिली सूर्यवंशी, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी, डॉ . उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयवंत नागुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
रॅली हि वैद्यकीय महाविद्यालय येथून पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर चौक, नवीन बस स्थानक, भजेगल्ली मार्गे पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात विसर्जित झाली. विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या रॅलीचे नेतृत्व विद्यापीठ प्रतिनिधी राज सिंग छाबरा याने केले. विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी विविध घोषणा दिल्या. या रॅलीत प्रबोधनासाठी स्वातंत्र्यवीर चौकात लघुनाटिका सादर करण्यात आली. रॅलीचे समन्वयन डॉ. डॅनियल साजी आणि डॉ. रितेश सोनवणे यांनी केले. रॅलीत विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.