नशिराबाद पोलिसांकडून संशयितांना अटक, कोठडी
जळगाव (प्रतिनिधी) :- कॉपर तारांचे भंगार देण्याचा बहाणा करून आंध्रप्रदेशातील एका व्यापाऱ्याला जळगाव तालुक्यातील भादली गावात बोलवून ५ जणांनी बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गावेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा (वय- ४१, रा. वेदी ता. पेदापांडू मंडल, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) हे परिवारासह वास्तव्याला आहे. कॉपर तारांचे भंगार खरेदी विक्रीचे व्यवसाय करत उदरनिर्वाह करतात. (केसीएन)गेल्या आठवड्यात त्यांना एका व्हाट्सअपवरून कॉपरचे भंगार विक्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जळगाव तालुक्यातील भादली गावातील एकाशी मोबाईलवरती फोन करून माहिती घेतली. मोबाईलधारकाने कॉपर तारांचे भंगार असलेले फोटो पाठवले. त्यानुसार व्यापारी दुर्गावेंकटेशराव काटाकोटा यांनी भंगार पाहिले, त्यानंतर त्यांनी मोबाईलधारकाला लोकेशन टाकण्याचे सांगितले.
लोकेशन नुसार ते जळगावला येण्यासाठी निघाले. सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता व्यापारी जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रिक्षाने भादली गावातील चहाच्या टपरीवर थांबले. तेथूनच व्यापाऱ्याने मोबाईलधारकाला फोन लावला.(केसीएन) मोबाईलधारकाने चहा टपरीवाल्याशी फोनवर बोलणं केले. चहा टपरीवाल्याने व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून गावाच्या बाहेर असलेल्या पाटचारी जवळील पंप हाऊस येथे नेले. तेथे चहा टपरीवाल्यासह इतर अनोळखी ४ जणांनी व्यापाऱ्याला पकडून मारहाण करून त्यांच्याजवळची सोन्याची साखळी, मोबाईल जबरदस्ती हिसकावला.
त्यानंतर व्यापाऱ्याच्या फोन-पे वरून ५० हजार आणि ४० हजार असे एकुण ९० हजार रुपये ऑनलाईन बळजबरीने ट्रान्सफर करून घेतले आणि पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर व्यापाऱ्याने मुंबई येथील त्यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.(केसीएन) त्यानुसार त्यांचा भाऊ जळगाव शहरात दाखल झाला. मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अज्ञात ५ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासाअंती पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील ५ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
संशयित आरोपींमध्ये प्रधूम गुलाब पवार (वय २२),अमजीत भास्कर भोसले (वय ३५), पप्पू गुलाब पवार (वय २३), सोना उर्फ सोन्या गुलाब पवार (वय २८), क्रिश उर्फ किरेश रफिक पवार (वय २४, सर्व रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश असून त्यांना दिवसांची ७ पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.
सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे, सपोनि अमित बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश देशमुख, रवींद्र तायडे, हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव, प्रशांत विरणारे, योगेश वराडे, शिवदास चौधरी, सागर बिडे यांनी केली आहे. सदर संशयित आरोपींना यावल तालुक्यातील मनवेल येथे जंगलात जाऊन अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल १ लाख ५१ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वरील पथकाचे कौतुक केले आहे.