जळगावातील मनपा अभियंता मारहाण प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी व फाईल गहाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भुपेश प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याला सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
गटारीचे बांधकाम रोखण्यासह प्रभाग समिती कार्यालयात जाऊन शुक्रवारदि. २ फेब्रुवारी रोजी भाजप पदाधिकारी भुपेश कुलकर्णी याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी कुलकर्णी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुरवणी जबाबात प्रभाग समिती कार्यालयातील वादाप्रसंगी कुलकर्णी याने गटारीच्या वर्कऑर्डरची फाईल चोरुन नेल्याचे म्हटले होते. या प्रकरणात कुलकर्णी याने अटकपूर्व जामीनसाठी दाखल केलेला अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला होता.
त्यानंतर त्याला शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रदीप बोरुडे यांनी भुपेशला राहत्या घरून अटक केली. त्याला शनिवार, १० फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता सोमवार, १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान भूपेश याने मागेही एकदा गैरवर्तन केल्याची माहिती आहे.