बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
विद्यार्थिनींनी काव्यवाचनासह सजीव देखाव्याद्वारे बहिणाबाईंच्या साहित्याला वाहिली आदरांजली
जळगाव : प्रतिनिधी : खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या कवितांमधून साकारलेल्या सजीव देखाव्याद्वारे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.


कवितांमधून बहिणाबाईंच्या साहित्याचा जागर
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या ‘माझी माय सरस्वती’, ‘अरे संसार संसार’, ‘देवा घरोट घरोट’, ‘अरे खोप्यामध्ये खोपा’, ‘मन वढाय वढाय’ यांसह विविध कविता सादर केल्या. पारंपरिक ग्रामीण जीवन, नातेसंबंध आणि मानवी भावभावना यांचे दर्शन घडविणाऱ्या या काव्यसादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमात धनश्री पटोळे, मोहनी नागपुरे, योगिता बारी, मयुरी अस्वार, मीनाक्षी माळी, हर्षाली नाईक, वैशाली नाईक, रोशनी ताडे, लीना मराठे, चैताली पानगडे, जयश्री येऊन, वैष्णवी काटोले, साक्षी बारी आणि चैताली बारी आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मनोज बारी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शालिग्राम बारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील मॅडम, नयना बारी मॅडम आणि प्रा. सुवर्णा बारी मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री तांदळे आणि वैशाली नाईक यांनी केले, तर आभार प्रा. सुवर्णा बारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.









