जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त


जळगाव: नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला एकमेकींच्या देराणी-जेठाणी असून, त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
उषा चंदन ससाणे (वय ४८, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव, मूळ रा. चाळीसगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. वाघ नगर, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या देराणी-जेठाणीची नावे आहेत.
सीसीटीव्ही आणि बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई
दिनांक १८ जुलै रोजी जळगाव ते चाळीसगाव बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व टॉगल चोरीला गेले होते. याप्रकरणी २० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २२६/२०२०, BNS कलम ३०३(२)) दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार स.पो.नि. अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकाद्वारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी महिलांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यांची (गु.र.नं. २२६/२०२६, १७३/२०२६ व २१२/२०२६) कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची मणी मंगळसूत्रे आणि टॉगल असा ऐवज जप्त करण्यात आला.
या महिलांवर अमळनेर व जळगाव शहर पोलीस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीएसपी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल वाघ, पोना संतोष सोनवणे (तपासी अंमलदार), पोहवा गणेश शिरसाळे, नरेश सोनवणे, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, तेजस मराठे, कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, मपोकॉ वैशाली सोनवणे, सुषमा ढमढेरे तसेच नेत्रम शाखेचे मुबारक देशमुख व रुस्तम तडवी यांनी केली.









