एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव (प्रतिनिधी): – तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगरात राहणारा भूषण रवींद्र खलसे (वय २५) हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह सोमवारी (दि. २४) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास नेव्हरे धरणात आढळून आला. या घटनेमुळे शिरसोली परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


भूषण खलसे हा तरुण रविवारी (दि. २३) सकाळी ८ वाजेपासून घरातून बेपत्ता झाला होता. तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी नेहारे धरणाच्या किनाऱ्यावर त्याची दुचाकी, मोबाईल आणि घड्याळ आढळून आले. यामुळे शंका आल्याने धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता भूषणचा मृतदेह मिळून आला.
घटनास्थळाची पाहणी करून पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तरुणाने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात झाला, या दोन्ही कोनातून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत असून, सध्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत भूषण याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याचे आई-वडील शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ऐन तारुण्यात मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने खलसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








