जळगाव तालुक्यातील मुर्दापूर धरणातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील एका १३ वर्षीय बालकाचा गावाच्या बाहेर असणाऱ्या उमाळा रोडवरील मुर्दापूर धरणात म्हशी चारत व पोहण्यासाठी गेला असताना शनिवारी दि. २५ मे रोजी दुपारी १ वाजता बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
हर्षल अशोक चौधरी (वय १३, रा. नशिराबाद ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, बहिणीसह राहतो. त्याच्या ४ बहिणींचे लग्न झालेले आहे. हर्षल हा ५ बहिणींच्या पाठीवरील एकुलता एक होता. त्याचे वडील हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी दि. २५ मे रोजी दुपारी तो गावातील एकाच्या म्हशी चारण्यासाठी गेला होता. उमाळा रस्त्यावरील मुर्दापूर धरणात गेला असता तेथे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
त्याच्या सोबत असणाऱ्याने आरडाओरड केली. आजूबाजूच्या ग्रामस्थ्यांनी धाव घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हर्षलची घरची परिस्थिती हलाखीची असून राहायला पुरेसे घरदेखील नाही, त्यामुळे हर्षलच्या मृत्यूबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.