शिर्डीच्या शिंदे गटाच्या पराभूत उमेदवाराचे मत
अहमदनगर (प्रतिनिधी) : शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पराभूत होण्यामागील अजब कारण सांगितले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे माझ्याविरोधात मतदान झालं. त्याचा भाजपाने जोरदार प्रचार केला.त्यामुळेच माझा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे, असेही सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर पूर्वी कर्जत-जामखेडमधून आमदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांनी अलिकडेच कर्जतला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, शिर्डीत आपला पराभव का झाला? काय कारणे असावीत? या प्रश्नांना उत्तर देताना सदाशिव लोखंडे यांनी धक्कादायक दावा केला.
सदाशिव लोखंडे म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. तो रावणाला मानणारा समाज आहे. अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे तो दुखावला गेला आणि त्यातून माझ्याविरोधात मतदान झालं. तसेच शिर्डी लोकसभेत साखर कारखानदारांचे मोठे साम्राज्य आहे. एक साखर कारखानदार दुसऱ्या विरोधात राजकीय लढाई करतो. त्यामुळे त्यांच्यातील लढाईचाही मला फटका बसला, असा अजब दावा सदाशिव लोखंडे यांनी केला.