जळगाव जिल्ह्यासाठी १४.५० कोटींची मदत मंजूर; १४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ
जळगाव (प्रतिनिधी) : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून रोजी जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

१४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
मंजूर मदतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ३६० बाधित शेतकरी आणि ७ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण १०६ कोटी ५६ लाख ४८ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी जळगाव जिल्ह्याला १४.५० कोटी रुपयांचा वाटा मिळाला आहे.
पाठपुराव्याला मिळाले यश
अवकाळी पावसानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधित विभागांकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने ही मदत मंजूर केली. या पाठपुराव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, मंगेश चव्हाण तसेच इतर लोकप्रतिनिधींचा सहभाग होता.
खरीप हंगामाला मिळणार बळ
मंजूर निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे. प्रशासनाला निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.








