तीन जण ताब्यात ; नशिराबाद पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्यावर नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तीन आयशर वाहने संशयावरून अडवली. त्यात अवैधपणे एकूण ५३ म्हशी यांची अवैध वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्यावरून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ३६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार टोल नाक्यावर जाऊन त्यांनी संशयित आयशर वाहने थांबवले. वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी १८, १८, व १७ अशा एकूण ५३ म्हशी आढळून आल्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कुठलेही प्रमाणपत्र न घेता तसेच प्राण्यांना त्रास होईल अशा पद्धतीने दाटीवाटीने गुरे कोंबून नेत असताना आढळून आली आहे.
त्यामुळे नशिराबाद पोलीस स्टेशनला पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सायब खान कलीम खान (वय २८), साहिद खान सलीम खान ( वय ३५, दोन्ही रा. खरगोन, मध्य प्रदेश) आणि चालक समीर शहा देवास शाह (वय २९, रा. देवास जि. इंदोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सपोनी रामेश्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.