अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी ) ;- नापिकी व बचत गटाच्या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून एका शेतकर्याने आत्महत्या केल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा बँक शाखेच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
येथील रहिवासी सुनील मधुकर पाटील (वय ४१) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे .सुनील पाटील हे गावातील श्रीराम मंदिराजवळील भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या घराजवळ असलेल्या जिल्हा बँक शाखेच्या ओट्यावरील शौचालयात रात्रीच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी एकच्या सुमारास जिल्हा बँकेतील कर्मचारी शौचालयात गेल्यावर सुनीलने गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविछेदन केले. याबाबत नारायण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आईवडिल, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.