पारोळा तालुक्यातील भोलाणे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोलाणे येथे शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी दि. २२ जून रोजी घडली होती. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान रविवारी दि. २३ जून रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकरी भागवत रघुनाथ पाटील (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पारोळा तालुक्यातील भोलाणे शिवारात गट क्रमांक १५०/२ येथे दि. २२ जून रोजी काहीतरी विषारी द्रव्ये सेवन केल्याने त्यांना प्रथम पारोळा कुटीर रुग्णालय येथे प्रथमोपचार करून धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यावर सोसायटीचे व हात उसनवारीचे कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकाकडुन सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.