जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा गिरीश ठाकूर..!
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभार घेऊन नवीन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांना दीड दिवस होत नाही तोवर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालयाने सोमवारी दि. २४ जून रोजी हाच आदेश पुन्हा फिरवला आहे. डॉ. गिरीश ठाकूर यांना पुन्हा जळगावच्या अधिष्ठाताचा पदभार घ्यायला सांगितला असून डॉ. भिसे यांना परभणी जाण्यासाठी सांगितले आहे.
दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध महाविद्यालयात याबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. डॉ. गिरीश ठाकुर यांच्या बदलीचे आदेश गुरुवार दि. २० जून रोजी निघाले होते. त्यांनी नवीन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांना शुक्रवारी दि. २१ जून रोजी पदभार सोपविला होता. त्यानंतर महाविद्यालयात डॉ. ठाकूर यांचा निरोप समारंभ देखील झाला. मात्र आता सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने आदेश फिरवून गिरीश ठाकूर यांना पुन्हा अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी सांगितले आहे.
तसेच डॉ. सदानंद भिसे यांना परभणी येथील त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश काढण्यात आले आहे. सदर आदेश वैद्यकीय शिक्षण व उच्च द्रव्य विभाग मंत्रालयाचे उपसचिव शंकर जाधव यांनी सोमवारी दि. २४ जून रोजी काढले आहे. डॉ. भिसे यांनी सोमवारी विविध कर्मचाऱ्यांची तसेच महाविद्यालयीन परिषदेची देखील बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या अजब कारभारावर टीका होत आहे.