५० लाखांच्या तडजोडीनंतरही १५ लाखांची मागणी
चोपडा (प्रतिनिधी) – म्हशी खरेदी व दूध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम पूर्णपणे फेडल्यानंतरही अतिरिक्त व्याजाची मागणी करून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भगवान शिवाजी पाटील (वय ४०, व्यवसाय दुग्ध व्यवसाय, रा. मजरेहोळ, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पाटील यांनी म्हशी खरेदी करण्यासाठी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयित आरोपीकडून १० लाख ५० हजार रुपये उसनवार घेतले होते. सदर कर्जाची संपूर्ण मुद्दल रक्कम तसेच त्यावरील व्याज अदा करूनही संशयित आरोपीकडून अतिरिक्त व्याजाची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या रकमेवरून तक्रारदार व आरोपी यांच्यात २९ जून २०२६ रोजी बैठक झाली. त्यावेळी आरोपीचे कोणतेही देणे शिल्लक नसल्याबाबत समझोता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही अधिक व्याजाची रक्कम मिळवण्यासाठी आरोपीकडून दमदाटी, अरेरावीची भाषा तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे.
या दबावामुळे तक्रारदाराने साक्षीदार प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून संशयित आरोपीला फोन-पेवरून १ लाख ५० हजार रुपये तसेच १ लाख ५० हजार रुपये रोख, असे एकूण ३ लाख रुपये अतिरिक्त व्याज म्हणून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही १५ जुलै २०२६ रोजी निर्मल डेअरी येथे आरोपीने तक्रारदाराच्या अंगावर जात दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता आरोपीने तक्रारदाराला पुन्हा फोन करून १५ लाख रुपयांची अतिरिक्त व्याजाची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(४), ३२९(४), १३१, ३५२, ३५१(२) तसेच सावकारी कायद्याच्या कलम ३९ व ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.





