अमळनेर शहरातील सराफ बाजार भागातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर इंधन ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील सराफ बाजार भागातील नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना नगरपरिषदेने त्यांना वेळोवेळी नोटीस बजावून ही अतिक्रमण काढले नाही. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी यांनी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली. त्यावेळी नागराज चोरडिया, त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया, सून किरण चोरडिया, वनिता चोरडिया हे सर्व मिळून तुम्ही हे अतिक्रमण काढू शकत नाही असे ओरडत जोरजोरात शिवीगाळ करू लागले.
तसेच इंदुमती चोरडिया यांनी स्वतच्या व सूनांच्या अंगावर इंधन ओतून घेवून, तुम्ही जर अतिक्रमण काढले तर जाळुन घेवून तुमचे नाव टाकून देवू अशी धमकी देवू लागले. सदर पथकाने चोरडिया कुटुंबाला हे कृत्य बेकायदेशीर असून कारवाई होईल असे सांगून ही त्यांनी शिवीगाळ करणे सुरू ठेवल्याने सदर पथक अतिक्रमण न काढता परतले. शासकीय कामात अडथळा आणुन शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ प्रमोद बागडे हे करीत आहेत.