पुढे चालणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याची घाई नडली
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळकडून जळगावकडे निघालेल्या ट्रकने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या डंपरला धडक दिली. या अपघातात दोन परप्रांतीय चालकांचा मृत्यू झाला व एक सहचालक जखमी झाला. महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील राजस्थान मार्बलजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने क्रेनद्वारे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
रिकामा ट्रक (जीजे.०२-झेडझेड.२९२२) भुसावळकडून जळगावकडे निघाला होता रेल्वे उड्डाणपूल परिसरात गोंभी (ता.भुसावळ) येथून आयुष प्रोकांत कंपनीसाठी खडी घेवून निघालेले डंपर (क्रमांक एमएच.१९-सीवाय.५३२७) समोरून येत होते. पुढे चालत असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक डंपरवर आदळला. या धडकेत महामार्गावरील दुभाजकांचेही नुकसान झाले. दोन्ही वाहनाच्या दर्शनी बाजूंचा चेंदामेंदा झाला. दोन्ही वाहनातील चालक, सहचालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी दोघांचा मृत्यू झाला. आयुष प्रोकांत प्रा.लि.कंपनीचे मेंटेनन्स विभागातील गंगाप्रसाद राजाराम निषद (रा.समदान अतशेला, ता.मेजा, प्रयागराज, इलाहाबाद) यांच्या फिर्यादीनुसार चालक तौसिफ रसूल कुरेशी विरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला.
या अपघातात डंपर चालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल (वय ५८, टिकुरी समदन, मेजा रोड, प्रयागराज, उत्तरप्रदेश) व ट्रकचालक अयुब हुसेन सिद्दीकी (नंदासन, मेहसाना, गुजरात) यांचा मृत्यू झाला.सहचालक तौसिफ रसुलभाई कुरेशी (वय ३२, रा.नंदासन, मेहसाना, गुजरात) हे जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.