जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांतील वाटाघाटींवर नामदार गिरीश महाजन यांची छाप दिसून आली. त्यात बोदवडची जागा भाजपकडे राहावी, यासाठी ते सुरुवातीपासून आग्रही होते. या मतदारसंघातून भाजपचे मधुकर रामचंद्र राणे, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक गोपाल बाबुराव गंगतीरे आणि रुपेश दामोदर गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गंगतीरे आणि गांधी या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मधुकर राणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.


बोदवडच्या जागेबाबत चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री गंगतीरे १५ मतदारांना सहलीवर घेऊन गेल्याची माहिती भाजपच्या गोटात पोहोचली. त्यामुळे बोदवडमधील मतांचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली. त्याच रात्री उशिरा महाजन यांनी आपले विश्वासू सहकारी अरविंद देशमुख यांच्यावर बोदवडमधील मतदारांशी संपर्क साधण्याची आणि त्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी सोपवली.
देशमुख यांनी रातोरात मतदारांशी संपर्क साधला आणि बोदवडहून २२ मतदारांना जळगावला आणले. एकूण ३७ मतदार असलेल्या या मतदारसंघात बहुमतासाठी १९ मतांची गरज होती. त्या संख्येपेक्षा तीन मतदार अधिक सोबत आल्याने राणे यांच्या बाजूला बळ मिळाले. ऐन वेळी सूत्रे हाती घेऊन देशमुख यांनी महाजनांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे बोदवडच्या या घडामोडीत ते महाजनांचे ‘ट्रबलशूटर’ ठरले.
अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात महाजन यांनी स्वतः वाटाघाटींची सूत्रे हाती घेतली. अखेर गोपाल गंगतीरे आणि रुपेश गांधी या दोघांनीही माघार घेतली. रातोरात साधलेला मतदारांचा समन्वय आणि शेवटच्या टप्प्यात महाजनांनी केलेल्या वाटाघाटी यामुळे बोदवडमधील चुरशीला पूर्णविराम मिळाला.






