चोपडा शहराजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा शहराच्या बाहेर असणाऱ्या एका पेट्रोलपंपाजवळ भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाल्याची घटना मंगळवारी दि. ७ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चेतन निंबा पाटील (वय २०) आणि रतन रमेश पाटील (वय ३९, दोन्ही रा. पारगाव ता. चोपडा) असे मयत दोन्ही तरुणांचे नाव आहे. पारगाव येथे दोघेजण परिवारासह शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. रतन पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. तर चेतन पाटील यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी दि. ७ मे रोजी दुपारी ४ वाजता चोपड्यातून पारगावला जात असताना शहराच्या बाहेर एका खाजगी पेट्रोल पंपासमोर भरधाव आलेल्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की, त्यात दोघेजण रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन जबर जखमी झाले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.
या वेळेला दोन्ही कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच् चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून रस्ता मोकळा केला. यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.