जळगाव 🙁 प्रतिनिधी ) – मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय राजेंद्र पाटील (वय ३५, व्यवसाय शेती, रा. प्लॉट नं. ४९, गट नं. ७६/१/२, कोल्हे नगर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, १६ मे २०२६ रोजी दुपारी २.३० ते रात्री १०.२० वाजेदरम्यान त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीच्या मोबाईलमध्ये नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचे कोणतेही ॲप नसतानाही संबंधित भामट्याने लिंकच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा घेतला.
यानंतर आरोपीने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे मोबाईल बँकिंग सुरू करून फिर्यादीच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहाराद्वारे ६ लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत असून अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.








