अमरावती जिल्ह्यातील चांदुर येथील घटना
अमरावती : -चांदूर येथे चौघांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपींनी अल्पवयीन पीडित मुली सोबत अनैसर्गिक कृत्यही केल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय प (वय.25), राजेश (वय.30), काल्या उर्फ आकाश (वय.30), शिवाजी (वय.27) या चार संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित आरोपींनी पीडित सोळा वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून चांदुर रेल्वे परिसरातील एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर सामुहिक अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य ही केले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिच्या डोळ्यात व तोंडात वाळू टाकली. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. पीडित मुलगी आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घरी पोहोचली. या घटनेने ती मुलगी प्रचंड घाबरली होती. घडलेली संपूर्ण हकीकत तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलीसह चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची तक्रार शनिवारी (दि.6) नोंदविली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.