तात्काळ सोडवला शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा मुद्दा
पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या अमोल शिंदे यांनी सदर विषयाला वाचा फोडली. शेतकऱ्यांचा विषय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडून तत्काळ पीककर्जाचा हा मुद्दा सोडविला.
पाचोरा-भडगांव विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव हरे.,वरसाडे तांडा, सातगाव डोंगरी, वडगाव कडे,अटलगव्हाण, शिंदाड, सार्वे, पिंप्री, खडकदेवळा, चिंचखेडा बु. डोंगरगाव, नगरदेवळासिम, निपाने, बदरखे, दिघी व इतर काही अशी गावे असुन यांच्या सीमा शेजारील जिल्हा असणाऱ्या छ.संभाजीनगर जिल्ह्याला लागून आहेत. येथील गावातील काही रहिवाश्यांच्या शेतजमिनी या छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे जळगांव जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे सदर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही व शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे,रासायनिक खते व इतर शेतीसाठी लागणारी साधने खरेदी करणे शक्य होणार नाही.
सदर शेतकरी जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या या पिक कर्ज योजनेपासून वंचित राहून आर्थिक संकटात सापडतील असे निवेदनाच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मांडून सदर विषयाला वाचा फोडली. सदर निर्णयाची माहिती मिळताच अमोल शिंदे यांनी, सदर निर्णय रद्द होणे अत्यंत गरजेचे असून या निर्णयामुळे संपूर्ण जिल्हयाच्या सीमा भागांतील गावांत राहणारे शेतकरी अडचणीत येऊ शकतात असे मंत्री गिरीष महाजन यांना भेटून सांगितले. हा निर्णय रद्द होण्याची आग्रही मागणी केली. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करत सूचना देऊन हा निर्णय मागे घेण्यास सांगितल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.
तसेच स्थानीक आमदार हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. मागील काळांत व्हा.चेअरमन पद त्यांनी भूषवले असताना देखील पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या का लक्षात येत नाही ? भडगाव येथील शेतकऱ्यांना २०१९ मधील नुकसाभरपाईची मदत ५ वर्ष होऊन गेल्यावर सुद्धा मिळतं नाही. २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यावर पीक विमा मिळवुन देण्यात आमदार अपयशी ठरलेत. परंतु शेतकरी बांधव हुशार आहेत त्यांना आता घरांत बसवल्याशिवाय राहणार नाहीत.असा घणाघात शिंदे यांनी केला आहे. जेव्हा – जेव्हा गरज पडेल तेव्हा पाचोरा- भडगांव तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा त्यांचा पूत्र अमोल शिंदे मैदानात उतरेल.अशी ग्वाही पत्रकारांशी बोलतांना दिली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील,शहराध्यक्ष दीपक माने, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, समाधान मुळे, मुकेश पाटील, जगदीश पाटील, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, योगेश ठाकूर, रोहन मिश्रा, अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.