अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील शहापूर येथील राकेश रतिलाल पाटील (वय ३२) या युवा शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (दि. २३) दुपारी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे शहापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे आपल्या आईसह शेतात गेले होते. शेतात मजूरही काम करत होते. दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे राकेश यांची आई व मजूर जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आश्रयासाठी थांबले होते.
यावेळी राकेश पाटील यांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करण्यासाठी रस्त्याकडे धाव घेतली. मात्र, त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. विजेचा जोरदार फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.









