अमळनेर शहरात घरफोडी: कुलूप तोडून ५६ हजारांचा मुद्देमाल लांबवला


अमळनेर (विशेष प्रतिनिधी): अमळनेर शहरातील स्वामी समर्थ केंद्रासमोरील दत्त हाऊसिंग सोसायटी (घर नं. १२/A) येथे राहणाऱ्या सुशीलाबाई अशोक पाटील (वय ६०, व्यवसाय-गृहिणी) यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण ५६ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. फिर्यादी सुशीलाबाई या ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेल्या असता, ४ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील २०,००० रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट, ३,००० रुपयांची ६ भार वजनाची चांदीची जोडवी, २,५०० रुपयांची ५ भार वजनाची चांदीची पैंजण, २,५०० रुपयांचे ६ भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट आणि २८,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सुशीलाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा रजि. नं. ४१३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तेली (पोहेकॉ/२०२०) हे करत आहेत.








