जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.१० वाजता जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात एका अंदाजे ४० ते ५० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा रस्ते अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला १०८ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), जळगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १२७/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करीत असून, मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








