मुंबई बॉम्बस्फोटातील जन्मठेपेच्या आरोपीचा निर्घृण खून
पहा कोणत्या कारागृहात घडले भयंकर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबईमधील १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेला व सध्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा रविवारी दि. २ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे मृत कैद्याचे नाव आहे. कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. रविवारी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान कारागृहातील हौदावर आंघोळ करत होता. यावेळी त्याला न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध यांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने डोक्यावर जबर मारहाण केली. यातच मुन्ना याचा मृत्यू झाला.
खूनाच्या या प्रकारामुळे कळंबा जेलमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. गांजा सापडणे, पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याने कळंबा जेल पुरते बदनाम झाले आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने कळंबा जेलच्या झाडाझडतीत ८० हून अधिक मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. दरम्यान, कोल्हापूरच्या या कळंबा कारागृहात जळगाव येथील स्थानबद्ध ४ ते ५ कैदी असल्याची माहिती मिळाली आहे.