मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यात मुंबईत एका रुग्णाचं निधन झालं आहे. मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. ५६ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला डायबेटिस, उच्च रक्तदाब आणि ह्दयाशी संबंधित आजार होता. करोनाची लागण झाल्याने त्यांना दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील करोनाची लागण झालेल्यांचा आकडा वाढत चालला आहे. आज करोनाचे १० नवे रुग्ण सापडले असून यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. मुंबईत सहा आणि पुण्यात चार नवे रुग्ण सापडले आहेत. यामधील पाच जणांनी परदेश दौरा केला होता. तर इतर चार जण यांच्या संपर्कात आले होते.