यावल तालुक्यातील बामणोद रस्त्यावरील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील शिपाई हे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून परतत असताना बामणोद गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. यात दुचाकीस्वार असलेल्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळू काळू पाटील (वय ५५, रा. हिंगोणा ता. यावल) असे मृत शिपायाचे नाव आहे. ते तहसीलदार कार्यालय, यावल येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. (केसीएन) शुक्रवारी दि. २० रोजी बाळू पाटील हे यावल येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी शासकीय कामानिमित्त गेले होते. तेथून फैजपूर प्रांत कार्यलयातील टपाल घेऊन भुसावळमार्गे परतत असताना बामणोद गावाजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या (एमएच १९ बीएच १३२६) या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत बाळू पाटील हे रस्त्यावर फेकले जाऊन जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. ग्रामस्थांनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. यावल रुग्णालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेऊन बाळू पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन केले. घटनेप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.