जळगाव शहरातील फातेमा नगरात एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार मंगळवारी स्वीकारल्यावर नूतन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते.(केसीएन)एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे शनिवार दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून छापा टाकला.
शोएब शेख शफी (वय-२०, रा.फातेमा नगर) याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते अशांनी केली आहे. घटनास्थळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.