जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क टायमर लावून मालवाहू वाहन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून वाहनातील सामान आगीत जळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात मुख्य चौकात राहणारे मतीन खान यांच्या मालकीचे वाहनातून नेहमी औषधी आणि इतर साहित्याची वाहतूक केली जाते. वाहन चालक सलीम खान बशीर खान यांनी गुरुवारी दि.७ रोजी वाहनात माल भरला होता. शुक्रवारी सकाळी ते पाचोरा जाण्यासाठी निघाले असताना उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनातून धूर दिसू लागला.
वाहन उघडून पाहिले असता त्यात एका खोक्यात काही फटाके, सुतळी बॉम्ब, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, फॅन्सी टायमर बॉम्ब असे साहित्य होते. आगीमुळे वाहनातील सामान जळले असून लागलीच आग विझवण्यात आली. आग नेमकी कुणी लावली आणि त्यांचा उद्देश काय याबाबत पोलीस तपास करीत आहे.