यावल तालुक्यातील किनगाव बसस्थानकातील घटना
यावल (प्रतिनिधी) : बसमध्ये चढण्याची घाई करीत असताना रावेर आगाराच्या बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने अहमदाबाद येथील ८१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली होती. या महिलेवर उपचार सुरु असताना दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरु होते.
कमलबाई रामराव एंडाईत (वय ८१, रा. अहमदाबाद,गुजरात) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या अहमदाबाद शहरात राहतात. त्यांच्या पश्चात मुलगा राकेश, मुलगी रेखा, सून, जावई असा परिवार आहे. राकेश पाटील हे रिक्षाचालक असून कन्या रेखा दीपक पाटील या पोलीस दलात कॉन्स्टेबल आहेत. (केसीएन) कमलबाई या किनगाव येथे गुरुवारी काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर अहमदाबादकडे जाण्यासाठी त्या किनगाव बसस्थानक येथे सकाळी १० वाजता आल्या. तेव्हा रावेर आगाराची बस क्रमांक (एमएच २० बीएल ३३९७) हि बऱ्हाणपूरवरून सुरतकडे जाणारी बस किनगाव येथील बसस्थानकावर आली.
हि बस थांबण्यापूर्वीच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत कमलबाई या बसच्या मागील चाकाखाली आल्याने खाली पडल्या. त्याचवेळी बसचे मागील चाक या महिलेच्या दोन्ही पायावरून गेल्याने झालेल्या अपघातात सदर महीला गंभीर जखमी झाली होती. जखमी महिलेला नागरिकांनी तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले होते. (केसीएन) तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आल्यावर शोक व्यक्त केला. अपघातग्रस्त बस किनगाव बस स्थानकावर थांबून आहे. यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. तर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात येत होती.