आमदार सांस्कृतिक महोत्सवा’मध्ये भरपावसात उदंड प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात सुरू असणाऱ्या आमदार राजूमामा भोळे आयोजित ‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’मध्ये शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी पाककला स्पर्धा व साडी वेशभूषा महोत्सव घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये दिवसभरात महिलांनी त्यांचे पाककौशल्य पणाला लावून परीक्षकांना चवीष्ट पदार्थ खाऊ घालत रंगत आणली. तर साडी महोत्सवात विविध महिला मंडळांनी सहभाग नोंदवून आपल्या पारंपरिक संस्कृतीचे सादरीकरण केले.
आपल्या जळगाव शहराचा आमदार सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दि. २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहांमध्ये सुरू झालेला आहे. आ. राजूमामा भोळे आयोजक आहेत. महोत्सवामध्ये शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशी पाककला स्पर्धा व साडी वेशभूषा महोत्सव घेण्यात आला. उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर संगीता पाटील, ज्योती श्रीवास्तव, माजी महापौर सीमाताई भोळे, राजश्री डोंगरे, शैला चौधरी, माजी नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीपमाला चिरमाडे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी त्यांच्या मनोगतमधून स्पर्धकांना सदिच्छा दिल्या. पाककला स्पर्धेत १९६ महिलांनी सहभाग नोंदवून त्यांचे पाककौशल्य पणाला लावले. प्रसंगी नागरिकांना व परीक्षकांना विविध प्रांतातील विविधांगी असलेले खाद्यपदार्थ चवीला मिळाले. तर दुपारी साडी महोत्सवात ३३ महिला मंडळांच्या ७५० महिलांनी सहभाग घेतला. यावेळी पारंपरिक विविधरंगी व विविध प्रकारच्या साड्या परिधान करीत महिला मंडळांनी सादरीकरण केले. दिवसभर पाऊस असला तरी मोठ्या संख्येने महिला वर्गाने उपस्थिती दिली.
महोत्सवाचा आज समारोप
दरम्यान, आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज दि. २५ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. सकाळी १० वाजता चित्रकला व रंगभरण स्पर्धा आणि पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर लोकनृत्य स्पर्धा शालेय व खुला गट यामध्ये घेतली जाणार आहे. तर दुपारी २ वाजता पाश्चिमात्य नृत्य स्पर्धा असून संध्याकाळी ६ वाजता आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप होऊन पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.