चोपडा तालुक्यातील चौगाव येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चौगाव येथील १८ वर्षीय तरुण शेतातून काम करून परत आला आणि त्याच्या तीन मित्रांसोबत चौगाव गावालगत पाझर तलावात दुपारी १२:३० वाजता पोहायला गेला. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने १२:४५ वाजेच्या सुमारास पाण्यात बुडाला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय बळीराम कोळी (१८) असे मयत तरुणाचे नाव आहे. चौगाव गावात तो परिवारासह राहत होता. गुरुवारी दुपारी तो पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे बुडून थेट गाळात रुतला. नाकातोंडात पाणी गेल्याने विजय कोळी याचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांच्या मदतीने विजय कोळी यास पाण्यातून वर काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.