“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हयात “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/कंपनी/महामंडळे यांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे नोंदविलेली आहे. त्यांचेद्वारे सदर योजनेसाठी उमेदवारांची निवड करुन कार्य प्रशिक्षणासाठी रुजू आदेश देण्यात येत आहेत.
सदर योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ महिन्यांचा असुन, उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे वितरण करण्यात येणार आहे. १२ वी पास उमेदवारांसाठी प्रतिमाह रु. ६.०००/- आय.टी.आय/पदविकाधारक उमेदवारांसाठी प्रतिमाह रु. ८,०००/- आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांसाठी प्रतिमाह रु.१०,०००/- अशाप्रकारे विद्यावेतन प्रशिक्षणार्थी लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. उमेदवारांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित आस्थापनांकडून अनुभव प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
तरी सदर योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी जिल्हयातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदविलेल्या रिक्तपदांना अर्ज करावा व शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.