जळगाव शहरातील पिंप्राळा येथे झाला होता अपघात
जळगाव (प्रतिनिधी) : पिंप्राळ्याकडून बाजार करून सावखेडा गावात जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास बुधा सोनवणे (वय २९, रा. सावखेडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले असा परिवार आहे. तर त्याची पत्नी आता आठ महिन्याची गरोदर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.(केसीएन)मजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील दीपक आत्माराम सोनवणे (वय ३२) हा तरुण गुरूवार १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता रामदास बुधा सोनवणे यांना घेवून (एमएच १९, ईएच ९८८५) क्रमांकाच्या दुचाकीने पिंप्राळा येथून सावखेडा जात होते. गावाच्या अलिकडे वासुदेव पाटील यांच्या शेतासमोर सावखेडा कडून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरुन धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे याच्या छाती व पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. तसेच रामदास सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यातील रामदास सोनवणे यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी दिपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विनोद कुंभार (पुर्ण नाव माहित नाही) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे.