अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील मुंदडा नगर परिसरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी दि. २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी दि. २७ जून रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंदडा नगर भागात ३५ वर्षीय महिला ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार दि. २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात महिलेसह तिच्या पतीला त्यांच्या परिसरात राहणारे संशयित आरोपी प्रभाकर भाईदास पवार आणि भाग्यश्री प्रभाकर पवार या दोघांनी अश्लील शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग देखील केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवार २७ जून रोजी मध्यरात्री १ वाजता प्रभाकर भाईदास पवार आणि भाग्यश्री प्रभाकर पवार या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.