जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची “केसरीराज”ला माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बेवारस व भिकारी वर्गाची परिस्थिती दयनीय असून उष्णतेच्या लाटेमुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या आशयाचे वृत्त रविवारी दि. २६ मे रोजी “केसरीराज”ने प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली आहे. भिकारी व बेवारस वर्गाकरिता आपण महानगरपालिका व तालुका स्तरावरील नगरपालिका यांच्या पातळीवर जे बेघर निवारा केंद्र आहे तिथे राहण्याची तसेच खाण्यापिण्याची सोय केली आहे. तसेच सामाजिक संस्थांना देखील सहभागी होण्याबाबत आवाहन केले आहे, अशी माहिती त्यांनी “केसरीराज”ला दिली आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेकदा या बेघर केंद्रात जाण्यासाठी भिकाऱ्यांची मानसिकता नसते. आज आपण पोलिसांचे मदतीने काही भिकारींना बेघर निवारा केंद्रात शिफ्ट केलेले आहे. आणि त्याला विनंती केलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी थांबावे. तसेच काही सामाजिक संस्थांना देखील विनंती केली आहे की, त्यांनी त्यांचे समुपदेशन करावं. काही सामाजिक संस्था देखील आता पुढे सरसावले असून प्रशासनासोबत त्यांचे चांगले समन्वयन सुरू आहे.
याबाबत महानगरपालिका आणि नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कुठलाही भिकारी अथवा बेवारस व्यक्ती हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहोत. विशेष करून रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड व इतर ठिकाणी जे भिकारी व बेवारस आढळतात, त्यांच्यासाठी हे काम आपण एक आठवड्यापूर्वी सुरु केलेला आहे. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तरी आपण त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत. यापुढे कोणाला काही अडचणी येणार नाही. प्रशासन याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
“केसरीराज” तर्फे नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सूचना
१.बेवारस, भिकारी असे आपल्याला रस्त्यात दिसले तर आपण त्यांना पिण्यासाठी पाण्याची बाटली द्या. जमलं तर जेवण देण्याचा प्रयत्न करा.
२.एखादा भिकारी किंवा बेवारस यांना ऊन लागले असल्याची शक्यता वाटत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्राला माहिती द्या.
३. जमलेच तर जवळ असल्यास मठ्ठा, मसाला ताक, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत यापैकी देशी पेय त्यांना पिण्यास द्या. जेणेकरून त्यांना उष्माघाताच्या लक्षणांपासून वाचता येईल.
४. त्यांना उन्हापासून लांब बसण्यास सांगा. सावलीच्या ठिकाणी त्यांना जाण्याचे सुचित करा.