जळगावातील मुख्य चौकातील दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुभाष चौकात दुचाकीचा कट लागल्याने व त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने ट्रिपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील फातेमा नगरात आवेश शरीफ खाटीक हा तरुण रिक्षा चालक राहतो. तो सुभाष चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभा होता. दरम्यान, गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणाहून ट्रीपलसीट दुचाकीस्वार जात होते. त्यांचा आवेशला कट लागल्याने आवेश याने गाडी हळू चालव असे म्हणाला. त्याचा राग आल्याने ट्रीपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी आवेशवर चॉपरने हल्ला केला. यामध्ये आवेश गंभीर जखमी झाला. भरदिवसा चॉपरने हल्ला झाल्यामुळे सुभाष चौक परिसरात खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र हल्लेखोर मात्र तेथून पसार झाले होते. याप्रकरणी आवेश खाटीक याने पोलीसांना माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून गोंधळ घालणाऱ्या तरुणांच्या दुचाकीच्या मालकांना शोधले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चॉपर आढळून आला आहे. त्यांच्यावर आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदर घटनेत रिक्षाचालकाला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली, चॉपरने हल्ला करण्यात आलेला नाही अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हि कामगिरी शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे.