महात्मा गांधी रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महात्मा गांधी रोडवर कारचे ऑईल खाली पडत असल्याचे सांगून कारमधून १ लाख ५० हजारांची रोकड ठेवलेली बॅग अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल काशिनाथ पलोड (वय ६७ रा. हरेश्वर नगर, जळगाव) यांचे दाणाबाजार परिसरात दुकान आहे. गुरूवारी २९ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून गोपाल पलोड कारने घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, महात्मा गांधी रोडवरून जात असतांना एका दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोपाल पलोड यांना कारमधून ऑईल पडत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे व चालकाचे लक्ष विचलित करून कार मध्ये ठेवलेली १ लाख ५० हजार रूपयांची रोकड असलेली बॅग दोघांनी लांबविली.
काही कळण्याच्या आत दोघे भामटे दुचाकी वरून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर गोपाल पलोड यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.