जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तंबाखूमुक्तीची शपथ व कुष्ठरोग निवारणानिमित्त प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरुवातीला अधिष्ठातांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत झाल्यावर तंबाखू मुक्तीची शपथ आणि कुष्ठरोग निवारणानिमित्त प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली. यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. रुग्णालय व महाविद्यालयात डॉक्टर्स, परिचारिका यांनी सलोख्याने राहावे. रुग्णसेवेला कायम प्राधान्य द्यावे. अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यास आपण तत्पर आहोत, असे डॉ. ठाकूर म्हणाले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे आणि परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले.